त्या रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. दूर दूर पर्यंत कोणी दिसत नव्हतं. मागे वळून बघितले तर थोड्या पाऊलखुणा होत्या. पण त्यासुद्धा माझ्याच. डोक्यात विचार आला...कधीपासून चालते आहे मी ? मग अन्धुकसं आठवलं..
एकटीनेच सुरुवात केली होती मी. पहिले काही दिवस फार छान गेले.प्रवास फार चांगला वाटत होता. लांबचा पल्ला गाठायचा होता म्हणून जोमाने चालले होते. मग थोडा थकवा जाणवला. आधारासाठी आजुबाजुला पाहिले..पण कोणी दिसले नाही. म्हंटले ठीक आहे...थोड़े अजुन पुढे जाऊ...मग मात्र फार गळल्यासारखं वाटलं. सोबतीला कोणी असेल तर किती बरं होईल असं वाटू लागलं. सावली तरी मिळावी अशी फार इच्छा होती. कुठेतरी दिसलीही सावली.. पण जवळ जाऊन पाहीलं तर फक्त आभास होता. थोडी हिरमुसले...अचानक खूप थकवा जाणवला. असं वाटलं मी पुढे जाउच शकत नाही...आणि मनात विचार आला...की मी का मदत शोधतेय? मला फक्त मीच मदत करू शकते...ज्या वाटेवर माझ्याशिवाय कोणीच नाही तिथे मी दुसरं कोणी येइल आणि मला मदत करेल ही अपेक्षाच किती पोकळ होती. चूक कळून चुकली होती. मग सुरू झाला ती सुधारण्याचा प्रयत्न. थोडे जड गेले आधी. मग हळू हळू सूर गवसला. पायात बळ आल्याच जाणवलं. आणि प्रवास पुन्हा जोमाने सुरु झाला.
कोणीतरी बोलाल्याचे आठवते... The journey is more beautiful than the destination... त्याचाच अनुभव घेतेय.सावल्या दिसतात अधून मधून...पण मी हसते आणि पुढे जाते...आभासामागे पळणे सोडलेय आता...रस्ता तोच आहे...एकाकी..शांत...पण मी एकटी नाही आता... सोबतीला आहेत माझ्या पाऊलखुणा...