Sunday, April 13, 2008

विरोधाभास

दिवसानंतर रात्र येणे हा तर जगाचा नियम आहे

सुखदु:खाच्या खेळातही हा नियम कायम आहे

काही वाईट होत असेल तर आपण चांगल्याची वाट पाहतो

आणि चांगले होत असताना उगाचच वाईट शंका घेत रहातो

जे आपले नाही त्याचीच ओढ जास्त असते

आणि ते कधीतरी मिळेल ही अपेक्षाही रास्त असते

म्हणूनच माणूस मृगाजळाच्या कल्पनेत रमतो

आणि मग विरोधाभासाचा हा खेळ त्याला हळूहळू जमतो

Tuesday, April 1, 2008

मनात घर करून गेलेले नाटक...

खूप दिवसांनी एक असे नाटक पाहिले ज्याच्या शेवटी लोकांनी उभे राहून टाळ्या वाजवल्या...नाटक होते भैय्या हातपाय पसरी...उत्कृष्ट संहिता, दर्जेदार सादरीकरण आणि विचार करण्यास उद्युक्त करणारा विषय...

एखाद्या सामान्य मुंबईकराप्रमाणे मी सुद्धा 'मुंबई कोणाची? घूसखोरी, अतिक्रमण' या विषयांकडे नेहमी तटस्थपणे बघत आले आहे. साध्या शब्दात सांगायचे तर दुर्लक्ष करत आले आहे. आणि तशी भूमिका असण्यामागे मुख्य कारण आहे अमराठी मित्रपरिवार. अशा विषयांवर भाष्य करून कळत नकळत त्यांना दुखवण्याचा माझा कोणताही उद्देश नाही.

पण तरिही...पण तरीही हे नाटक मनात घर करून गेले. तसे पाहिले तर बाहेरून कोणीही आले तरी मुंबईने कोण असे न विचारता त्याला सामाउन घेतले आहे. पण याचा परिणाम काय झाला याचे उत्तर फारसे सुखावणारे नाही. मुंबईच नव्हे तर इतर मोठ्या शहरातही लोकसंख्येचे जे केन्द्रीकरण होत आहे त्यामुळे तेथील सोई- सुविधांवरील ताण वाढत आहे. लवकरच बाकी शहरातही स्थानिक आणि परप्रान्तीय असे वाद सुरू होतील.आणि म्हणूनच गरज आहे या समस्येचे मूळ शोधण्याची व त्यावर उपाययोजना करण्याची. मुंबईत आलेल्यांना हुसकाऊन लावण्यापेक्षा लोकांना मुंबईत यायची गरजच पडणार नाही असे काहीतरी करायला पाहिजे. ग्रामीण भारतात चांगल्या शिक्षण तसेच रोजगार योजना राबवून हे काही प्रमाणात साध्य करता येइल. तसेच गावागावापर्यंत औद्योगिकीकरण पोहोचवण्याची वेळ आता येउन ठेपली आहे. पण हे सगळे करताना जर काही बाजूला ठेवणे गरजेचे असेल तर तो आहे राजकीय स्वार्थ. नाहीतर नंदीग्रामची पुनारावृत्ती होईल. सर्व राजकीय पक्ष जर आपले हित बाजूला ठेउन देशाच्या हिताचा विचार करू लागले तर भारतापुढील अर्धे प्रश्न कमी होतील.

हे सगळे शक्य होईल जेव्हा नेता अणि जनता यांचे या गोष्टीवर एकमत होईल. हे एकमत घडवून आणण्याचे काम प्रसारमाध्यमे करू शकतात. पण त्यासाठी त्यांना त्यांच्या 'Breaking News' च्या दुष्टचक्रातून बाहेर पडावे लागेल. बातम्यांचा बाजार करणे थांबले की महत्वाच्या बाबी आपोआप नजरेसमोर येतील त्यांच्या.

असो... 'भैय्या' सारखी अजुन नाटकं बनावीत आणि नाटक व चित्रपट हे फक्त करमणुकीकरता मर्यादित न राहता विचार प्रबोधनाची साधनं बनावीत हीच सदिच्छा....आतासुद्धा कानात गुंजत आहेत त्या नाटकाच्या शेवटी सर्व कलाकारांनी गायलेले 'जय जय महाराष्ट्र माझा' , त्यात नकळत मिसळले गेलेले आम्हा मुंबईकरांचे सूर आणि एका चांगल्या कलाकृतीला मनापासून दाद देताना केलेला टाळ्यांचा कडकडाट...